नदीकाठचे भूत
सायंकाळची वेळ होती. गावातील लोक पारावर बसली होती. त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. तेवढ्यात त्यांना समोरून रामू पैलवान येताना दिसला. लोकांनी रामूला आवाज दिला. रामू पैलवान लोकांच्या गप्पा गोष्टीत सहभागी झाला. बोलता-बोलता विषय भुताचा निघाला.
रामू पैलवान मोठ्या दिमाखात म्हणाला, "कसलं भूत आणि कसलं काय?" पारावरील एक माणूस म्हणाला, "मग लावतोस का पैज. " रामू म्हणाला, "कसली पैज?" दोन दिवसांनी अमावस्या आहे. अमावस्येच्या मध्यरात्री नदीकिनारी जाऊन एक लोखंडी खिळा ठोकायचा आणि माघारी यायचं. रामूने पैजेचा विडा उचलला. दोन दिवसांनी पुन्हा सगळे पारावर जमा झाले. थंडीचे दिवस होते म्हणून रामुने अंगावर घोंगडी आणली होती. एका जणाने पैलवानाच्या हातात लोखंडी खिळा दिला. रामू पैलवानाने तो लोखंडी खिळा हातात घेतला आणि नदीकडे निघाला. अंधार पसरला होता. रातकिड्यांची किरकिर चालू होती. पण रामुच्या मनात कसलीच भीती नव्हती. तो नदीकिनारी पोहोचला. नदीच्या पाण्याचा आवाज येत होता. त्या अंधारी रात्रीत नदीचा आवाज मनात भीती निर्माण करत होता. रामूने हातातील खिळा घेतला आणि तो घाईघाईने नदीकिनारी ठोकू लागला. खिळा ठोकून झाला तसा रामू उठला आणि माघारी फिरला. पण रामूला जाणवले त्याची घोंगडी कोणीतरी मागे अोढून धरली आहे. रामूने घोंगडी सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु घोंगडी काही सुटेना. आता मात्र रामू घाबरला. त्याला वाटलं आपली घोंगडी मागे भूतानी धरली आहे. घोंगडी तिथेच सोडून तो पळत सुटला. पारावर न जाता घामाघूम होत घरी गेला. लोकांनी रामूला पळत जाताना पाहिले. सगळे लोक रामूच्या घरी जमा झाले. रामू घाबरलेला होता. त्याला काही बोलता येत नव्हते. अंग घामाने भिजले होते. रामू फक्त म्हणत होता, भुताने मला पकडले होते. पण थोडक्यात वाचलो. तेवढ्यात एक म्हातारबाबा पुढे आला आणि रामूला म्हणाला, "अरे भूत नसतेच". पण रामू काही मानेना. त्याची भीती काही जाईना. बाबा म्हणाले, "ठीक आहे, आपण सकाळी नदीकाठी जाऊ आणि पाहू तरी काय झाले ते". सकाळ झाली. सगळे लोक रामू पैलवानाला घेऊन नदीकिनारी गेले. ज्या ठिकाणी खिळा ठोकला होता ते ठिकाण त्यांनी पाहिले. रामूने घाईघाईत खिळा घोंगडीत ठोकला होता. जसा रामू उठला तसे त्याला वाटले आपली घोंगडी मागे भुताने धरली आहे. रामू पैलवानाची सुद्धा खात्री झाली भूत नसतेच. आपल्या मनात भीती निर्माण झाली की आपल्या भोवताली खोटी भुते नाचू लागतात. सगळे हसतच पुन्हा पारावर येऊन बसली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment