वीरमाता जिजाबाई
वीर माता जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखोजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्य प्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला, तरी सुलतानाच्या दरबारात त्याचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होते. जिजाबाईंच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण चालूच राहिले. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment