शेरास सव्वाशेर
नानाकाका घुंगूरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावर डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर, सोन्यासारखी पिवळे भाताचे पीक! नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता.
'निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली,'असे गाणे गुणगुणत नानाकाका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडलेल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीरमामा कोपले होते.
नानाकाकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धेअधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तरफेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नानाकाका शेतावरून घरी आले.
सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने तीन -चार उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नानाकाका पिंपापाशी गेले. भजी फस्त केलेली होती. पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली. सर्वत्र भाज्यांचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. आपसात काहीसे कुजबुजले. त्यांच्यापैकी चार पाच उंदीर बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला. प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहीमेवर कूच केले. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदरांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
Post a Comment