शाळेची घंटा वाजली. मुले वर्गात जाऊ लागली.अमितही वर्गाकडे निघाला. आज मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता होती, कारण आज मुलांच्या परीक्षेचा निकाल लागणार होता. अमित मात्र दुःखी होता. मनामध्ये भीती दाटलेली होती. मुले वर्गात बसली. सरांनी मार्क सांगण्यास सुरुवात केली. अमितचा नंबर आला. अमित काठावर पास झाला होता. अमितकडे बघून सगळी मुलं हसू लागली. अमित दु:खावला.शाळा सुटल्यानंतर अमितचे पाय घराकडे वळलेच नाहीत. तो माळरानावरील एका टेकडीवर गेला. एका दगडावर बसून विचार करू लागला. त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला. समोर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक छोटे माकडाचा पिल्लू चढण्याचा प्रयत्न करत होते. एकदा, दोनदा, तीनदा कितीतरी वेळा ते प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळेस ते खाली पडायचे. पुन्हा ते पिल्लू प्रयत्न करायचे. असे किमान पंधरा ते वीस वेळा झाले. त्याने प्रयत्न केलाच आणि शेवटी ते झाडावर चढले. त्या माकडाच्या पिल्ल्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. अमितच्या डोक्यात प्रकाश पडला. ते पिल्लू इतक्या वेळा प्रयत्न करू शकते, तर मी का करू शकणार नाही? अमित आनंदाने घरी परतला. हात पाय धुतले आणि अभ्यासाला लागला. मनामध्ये निश्चय केला, मी सुद्धा प्रयत्न करीन आणि पुढच्या वेळेस जास्तीत जास्त यश मिळवेन.
Post a Comment