नेहमी खरे बोला
एका शेतामध्ये काही शेतकरी काम करण्यात दंग होते. जवळच एका झाडावर गणु नावाचा मुलगा बसला होता. त्याने आपल्या शेळ्या शेतात चरायला आणल्या होत्या. गणूला बसून बसून खूपच कंटाळा आला. त्यामुळे त्याने शेतातील लोकांची सहज गंमत करायची ठरवली. तो मोठ्याने ओरडू लागला, "लांडगा आला रे आला! लांडगा आला रे आला! माझ्या शेळ्या वाचवा". लांडगा आला असा आवाज ऐकून शेतकरी हातातील कामे टाकून, काठ्या घेऊन पळत आले.
पाहतात तर काय शेळ्या चांगल्या शांतपणे चरत आहेत आणि गणू खो खो हसत होता. हे पाहून शेतकऱ्यांना खूप राग आला, ते म्हणाले,"अरे गणू असे खोटे का बोलतोस.आम्ही आमचं काम टाकून आलो तुझ्याकडे. शेतकरी पुन्हा आपापल्या कामात दंग झाले. दुसऱ्या दिवशी गणूला पुन्हा त्यांची गंमत करण्याची लहर आली. गणू ओरडू लागला, धावा ,धावा लांडगा आला रे आला! माझ्या शेळ्या वाचवा." शेतात काम करणारे लोक पुन्हा काठ्या घेऊन पळत आले. पाहतात तर काय शेळ्या शांतपणे चरत आहेत आणि गणू खो ss खो हसत आहे.
आता मात्र शेतकरी खूपच रागावले. गणूला म्हणाले, "परत जर तु अशी आमची गंमत करणार असशील तर आम्ही येणार नाही." असे म्हणून ते लोक पुन्हा आपापल्या कामात दंग झाले. तिसऱ्या दिवशी मात्र खरोखरच लांडगा आला आणि गणूच्या शेळ्या ओढून खाऊ लागला. गणू खूप घाबरला आणि ओरडू लागला,"पळा रे पळा, लांडगा आला, माझ्या शेळ्या वाचवा."शेतातील लोक ऐकत होते परंतु ते म्हणाले, "हा रोजच आपली गंमत करतो, आजही गंमतच करत असेल." त्यामुळे कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
गणु खूप रडू लागला. रडत गणू ओरडू लागला," खरच लांडगा आला आहे,पळा, धावा, माझी मदत करा. माझ्या शेळ्या वाचवा." परंतु त्याच्या मदतीला कोणीही आले नाही.नेहमी खोटे बोलण्यामुळे गणूची फजिती झाली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment