शायिस्ताखानाची फजिती
शाहिस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने रयतेला त्रास देण्यास सुरुवात. केली शेतीची नासधूस केली. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उद्ध्वस्त केला. शाहिस्तेखानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे. असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा. महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महाला भोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 ची रात्र. वाजत-गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री- पुरुष नटून-थटून चालले होते. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंती कडे सरकली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच महाल तो, त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्तेखाना असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शाहिस्तेखान घाबरला. सैतान, सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्तेखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खिडकीतून उडी टाकून खान पळाला. शिवाजी आला, धावा, धावा! पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहीली. शाहिस्तेखानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल, अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला. तो शाहिस्तेखानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Chane
ReplyDeletePost a Comment