भरतपूर नावाचे गाव होते. गावामध्ये रामू आणि त्याची बायको पारू राहत होते. त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती. त्यांच्याकडे दोन-तीन म्हशी होत्या. रामू म्हशी जवळच्या माळावर घेऊन चरायला जात असे. रामूची बायको पारू प्रेमळ होती, पण तशीच भांडकुदळ सुद्धा होती. एक दिवस रामू आणि पारूचे जोराचे भांडण झाले. रामू पारूवर रागवला. गोठ्यातील म्हशी सोडल्या आणि शिदोरी न घेताच तो तसाच माळावर गेला. दिवस वर आला. ऊन तापू लागले. पोटामध्ये भूकही वाढली. पण रामूने ठरवले आज काही घरी जायचे नाही. पारू बरोबर बोलायचे नाही. तो तसाच झाडाखाली झोपून राहिला. सूर्य मावळतीला गेला होता. पाखरे माघारी आपल्या घरट्याकडे आली होती. रामूलाही घराची ओढ लागली. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. घरी जावे कसे? आपण तर माघारी येणार नाही असे भांडून आलो आहे. काय करावे, हे त्याला सुचेना. दिवस मावळला. नेहमीच्या सवयी प्रमाणे रामूची जनावरे घराच्या दिशेने चालू लागली.
रामुच्या डोक्यात एक युक्ती आली. त्यांने म्हशीच्या गळ्यातील दोरीला धरले आणि तो म्हशीच्या मागे चालू लागला. घराच्या जवळ येतात रामूची बायको पारू दारातच उभी होती. रामूला पाहताच लटके रागाने पारू म्हणाली, "अहो !आज तुम्ही घरी येणार नव्हता ना?" रामू म्हणाला, "अगं नव्हतो येणार. पण बघ ना, या म्हशीनेच मला येथे आणले आहे. मी किती तरी वेळा तिला म्हणतोय, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?
Post a Comment