ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते.आई, वडील व मुलगा.त्यांच्याकडे एक छोटेसे गाढव होते.एक दिवस वडील मुलाला म्हणाले, "बाळा, आपण शेजारच्या बाजारी जाऊ आणि आपले हे गाढव विकू." मुलगा आणि वडील गाढवाला हाताने धरून बाजाराकडे जाऊ लागले.जाताना एका झाडाखाली काही माणसं बसलेली होती. त्यांनी त्या मुलाला व वडिलांना गाढव घेऊन जाताना पाहिले. लोक कुजबुजले किती वेडे आहेत हे? कोणीतरी एकाने त्या गाढवावर बसायला पाहिजे की नाही? लोक हसू लागले. वडिलांनी विचार विचार केला व मुलाला म्हणाले, "बाळा तुझे पाय दुखत असतील, तू गाढवावर बस".मुलगा गाढवावर बसला आणि ते पुढे चालू लागले.
पुढे असेच काही लोकं बसलेले होते. मुलाला गाढवावर बसलेले पाहून लोक कुजबुजली. कसा हा मुलगा, आपल्या म्हातार्या वडिलांना पायी चालवतोय आणि स्वतः मात्र राजासारखा बसलाय गाढवावर. मुलगा मनातून खजील झाला, तो खाली उतरला आणि वडिलांना गाढवावर बसवून पुढे चालू लागले.
पुढे गेल्यानंतर रस्त्याने काही लोकं चालले होते. ते लोक कुजबुजले. काय हा माणूस आहे? एवढ्या छोट्या मुलाला चालत चालवले आहे आणि स्वतः मात्र गाढवावर आरामात बसला आहे. वडिलांनी ते ऐकले आणि त्यांना खूप वाईट वाटले. ते खाली उतरले. पुढे नदीवर एक पूल आलेला होता. वडिलांनी विचार केला, लोक म्हणतात ते बरोबर आहे आणि दोघांनी मिळून त्या गाढवाचे पाय बांधले. गाढवाच्या पायामध्ये काठी घातली आणि गाढवाला पाठीवर घेऊन दोघे पुढे जाऊ लागले. मात्र पुलावरून जाताना गाढवाने पायाने झटके मारले आणि ते नदीमध्ये पडले. कदाचित त्या दोघांनी लोकांचे बोलणे ऐकले नसते तर त्यांचे गाढव सुरक्षित बाजारापर्यंत पोहोचले असते. म्हणून म्हणतात ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment