सोन्याचे अंडे
एक गरीब शेतकरी शेताच्या बांधावर छोट्याशा झोपडीमध्ये राहत होता.त्याची बायको पुष्पा ही खूप स्वार्थी होती. ती त्याच्याबरोबर भांडणही करत असे. एक दिवस फिरता-फिरता झाडाच्या वेलीमध्ये एक कोंबडी त्या शेतकऱ्याला दिसली. तिच्या पायाला जखम झाली होती. शेतकऱ्याने तिला घरी आणले. तिच्यावर उपचार केले. तिला दाणापाणी खाऊ घातले आणि टोपलीखाली झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी शेतकरी उठला, त्यांने टोपलीतील कोंबडी सोडली. पाहतो तर काय? कोंबडीने अंडे घातले होते, तेसुद्धा सोन्याचे!
त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे आपल्या बायकोला दाखवले. पुष्पालाही सोन्याचे अंडे पाहून खूप आनंद झाला. दोघेही कोंबडीची खूप काळजी घेत. सोन्याचे अंडे विकून त्यांनी छानसे घर बांधले. मात्र, पुष्पाचा स्वभाव स्वार्थी होता. ती एक दिवस नवर्याला म्हणाली, "अहो! असे रोज एक, एक अंडे गोळा करण्यापेक्षा कोंबडीला कापून टाका. म्हणजे तिच्या पोटातील सगळी अंडी एकदाच आपल्याला मिळतील. शेतकऱ्याला तिचा राग आला, पण त्याचा नाईलाज होता.
दुसऱ्या दिवशी त्याने कोंबडीला जवळ घेतले. तिच्यासमोर पाणी ठेवले, दाणे टाकले. पण कोंबडीने काहीच खाल्ले नाही. कदाचित तिला त्यांच्या मनातील कपटी विचार कळला असेल. पुष्पा आणि शेतकरी या दोघांनी तिला मारले, आणि तिच्या पोटामध्ये अंडे शोधू लागले. मात्र, तिच्या पोटामध्ये काहीच नव्हते. स्वार्थीपणा मुळे त्यांना मिळणारी सोन्याचे अंडे कायमचे गमवावे लागले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment