भाकरीची गोष्ट
स्वराज आज बापू बाबांबरोबर शेतात गेला. त्याला भूक लागली.आंब्याच्या झाडाखाली स्वराज, तेजस व बाबा जेवण करायला बसले. थोड्या वेळातच तेजसचे जेवण झाले.
शिल्लक राहिलेली अर्धी भाकरी त्याने टाकून दिली. बाबा तेजसला म्हणाले, "का रे? भाकरी टाकून दिली." माझे पोट भरले बाबा. अरे, मग अशी भाकरी का टाकायची? तेजस म्हणाला, "काय झाले त्यात, अर्धीच तर टाकली." बाळा त्या अर्ध्या भाकरीसाठी किती लोकांना कष्ट करावे लागते, माहित आहे का तुला? ठीक आहे. आज मी तुला भाकरीची गोष्ट सांगतो. सांग बरं आपल्याला भाकरी कशाकशाची मिळते.
स्वराज चटकन म्हणाला, "ज्वारी, बाजरी या धान्यांपासून. तेजस म्हणाला, आणि नाचणीची पण भाकरी करतात."बाबा म्हणाले, "बरोबर! मग मला सांगा बरं, ही ज्वारी, बाजरी येते कोठून? दोघेही पटकन म्हणाले, "शेतातून"बाबा म्हणाले, "बरोबर सांगितलं."पण शेतकऱ्याला प्रथम जमिनीची मशागत करून घ्यावी लागते. त्यानंतर शेतकरी शेतात ज्वारी किंवा बाजरी पेरतो. पेरणीनंतर धान्य उगवून येते. त्याला पाणी द्यावे लागते. त्या धान्यात बरोबर तणही येते. तण म्हणजे गवत. यासाठी खुरपणी करावी लागते. या नंतर पीक मोठे झाल्यावर त्याला कणसे लागतात. मग कणीस निबर होऊ लागले. त्याची राखण करावी लागते. नंतर कापणी, मळणी आणि मग धान्य शेतकऱ्यांच्या पदरात पडते. मग शेतकरी ते वाहून आपल्या घरी किंवा बाजारात नेतो. त्याठिकाणी विकले जाते. तेथून आपण ते विकत आणतो. आई दळण करते. ज्वारी किंवा बाजरीचे पीठ करून आणते. पीठ मळते आणि मग गरम गरम तव्यावर गरम-गरम भाकर तयार होते. पाहिलेस भाकरी किती कष्टाने तयार होते. म्हणून बाळांनो, आपल्या ताटातील अन्न असे वाया घालवायचे नाही. त्यासाठी कित्येक लोक राबलेले असतात. कित्येकांच्या कष्टाने ते अन्न तयार झालेले असते. अन्नाचा आदर करायला शिका. दोघांनाही बाबांचे म्हणणे पटले. येथून पुढे आम्हाला हवे तेवढेच आम्ही ताटात वाढून घेऊ असे त्यांनी सांगितले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment