अकबर व बिरबल
अकबर बादशहाला एकदा बिरबलाची चेष्टा करण्याची लहर आली. अकबराने बिरबलाला सांगितले की बिरबल मला बैलाचे दूध हवे आहे. मला एक औषध बैलाच्या दुधातून घ्यायला सांगितलेले आहे, म्हणून मला बैलाचे दूध पाहिजे आहे. यावर बिरबल म्हणाला," हो देतो आणून महाराज, परंतु मला चार दिवस लागतील." अकबर बादशहा म्हणाला,"ठीक आहे चार काय तुम्ही आठ दिवस घ्या, पण मला बैलाचे आणून द्या." ठीक आहे म्हणून बिरबल निघून गेला.
चार-पाच दिवसांनंतर बिरबलाने आपल्या एका मुलीला सांगितले,"अकबर बादशहा झोपतात त्या राजवाड्याच्या समोर रात्रीच्या बारा वाजता तू कपडे धुऊ आणि कपड्यांचा मोठ्या मोठ्याने आवाज येईल अशाप्रकारे कपडे धुऊ.कोणी काही विचारले तर काही सांगू नको, बादशहाने बोलावले तर बादशहा कडे जा आणि मग बोल," मुलीने बिरबलाने सांगितल्याप्रमाणे केले.
बादशहाला रात्री खूप जोरा जोरात आवाज येऊ लागला. बादशहाची झोपमोड झाली. बादशाहने एवढ्या रात्री कपडे कोण धूत आहे? याची चौकशी करायला शिपायांना पाठवले. शिपायांनी तिला विचारले,"एवढ्या उशिरा तू कपडे का धूत आहेस?" ती मुलगी काहीच बोलली नाही. शिपाई त्या मुलीला घेऊन बादशहाकडे आले. बादशाहने त्या मुलीला विचारले की," तू एवढ्या रात्रीची का कपडे धुत आहेस?" यावर ती मुलगी म्हणाली,"अहो, महाराज माझ्या वडिलांना बाळ झाले आहे आणि त्याला सारखे कपडे लागत आहेत म्हणून मी रात्री कपडे धूत आहे," बादशहा म्हणाला,"पुरुषाला कसं काय मूल होऊ शकते?" हे ऐकून ती मुलगी म्हणाली,"जर बैल दूध देऊ शकतो तर पुरुषांना का नाही मूल होऊ शकणार?" बादशहाच्या लक्षात बिरबलशी झालेले बोलणे आले. बादशाहने त्या मुलीला विचारले,"कोणाची आहेस तू?" यावर ती मुलगी म्हणाली,"मी बिरबलाची कन्या आहे."
तिला घरी पाठवुन दुसऱ्या दिवशी बादशहाने बिरबलाला बोलावून घेतले आणि राजवाड्यात एकच हशा पिकला.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment