पाणी किती खोल?
म्हशीला कडबा चावता येत नव्हता.ती म्हातारी झाली होती.तिने आपला नातू रेडकाला हाक मारली.बाळा, माझे एक काम करशील? कडब्याची पेंढी नदीपलिकडच्या कडबाकुट्टी वरून कापून घेऊन ये. म्हणजे, मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू आनंदाने म्हणाले, "दे मला पेंढी बांधून आणि एक रिकामा पोत सुद्धा दे, कुट्टीसाठी. आता कापून घेऊन येतो. रेडकू कडब्याची पेंढी घेऊन नदी जवळ आले.
नदीला पाणी पाहून विचारात पडले. तेवढ्यात शेजारीच उभे असलेले बैलकाका म्हणाले, "अरे काळजी करू नको, गुडघ्याइतकच तर पाणी आहे, आरामात जाशील. रेडकू पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताईने त्याला हाक मारली. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जातील. मागे फिर. रेडकू पटकन मागे फिरले व खारुताईला म्हणाले, "अगं, बैल काकांनी सांगितले आरामात जाता येईल.
" खारुताई म्हणाली, मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रिण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करु नको. मागे फिर. रेडकू विचारात पडले. ते गोंधळून गेले होते. ते तसेच माघारी आले. रेडकाला पाहून म्हैस म्हणाली, "का रे ? लगेच परत आलास. कुट्टी बंद होती का? रेडकू म्हणाले, "मी पुढे गेलोच नाही. नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आले आहे. म्हैस म्हणाली, "असं कसं होईल? सकाळी तर गाढव दादाला नदी पार करून आला. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं. हो पण, मला खारुताई म्हणाली, "काल तिची मैत्रीण वाहून गेली. म्हणून मी घाबरलो.म्हैस हसत हसतच म्हणाली, अरे नीट नीट विचार कर. खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना? पण खारुताई पेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही? मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात आता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. असे म्हणत रेडकू आनंदाने उड्या मारत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment