रोपटे
खेळाचा तास सुरू झाला.मुले गटागटाने खेळू लागली.पप्पूला मात्र कोणीही त्याच्या गटात घेत नव्हते.तो नेहमी चिडका खेळायचा.राज्य आलं तर घेत नसायचा. पप्पू म्हणाला माझ्यावर राज्य आलं, तर मी नक्की घेईन. शिवाशिवीच्या खेळाला प्रारंभ झाला. पहिले राज्य मीनल वरती आले. तिने सर्वांच्या मागे धावण्यास सुरुवात केली. पप्पू तर मीनलची गंमतच करत, ती जवळ आली, की धूम पळायचा. मीनल थकून गेली. ती एका दगडावरती जाऊन बसली. पप्पू पुन्हा गंमत करण्यासाठी तिच्या जवळ गेला. मीनलने त्याच्यावर झडप घातली. पप्पू धपकन खाली पडला. पप्पूने राज्य घेण्यास नकार दिला. त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला खेळात कोणी घेत नव्हते. सगळा गट राज्य घे राज्य घे म्हणत पप्पूच्या मागे जाऊ लागला. तो एकदम शांत झाला. एका बाजूला जाऊन बसला. मनात विचार सुरु झाले. माझ्यावर राज्य आलं, की मी चिडतो. राज्य घ्यायला टाळाटाळ करतो. सगळ्यांना त्रास देतो. अशांन मला कुणीच खेळात घेणार नाही. तो आपल्याच विचारात दंग होता. शाळेच्या परिसरात लावलेल्या एका नाजूक रोपट्यावर त्याचा नकळत पाय पडला. ते रोपटे मीनलने लावले होते. त्याचा शेंडा मोडल्याचे सर्व मुलांनी पाहिले. आपल्याकडून चूक झाली, मुले आता गुरुजीला सांगणार. पप्पू ची तर घाबरगुंडी उडाली. खेळाचा तास संपला. सर्व मुले वर्गात आली. गुरुजी वर्गात आले. सर्व मुले खाली बसली. पप्पू मात्र उभा राहिला आणि म्हणाला, "गुरुजी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मीनलच्या लहानशा रोपट्यावर माझा पाय पडला. त्याचा शेंडा तुटला. हे सांगताना पप्पूला रडू आवरत नव्हते. गुरुजी त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते. परंतु गुरुजी पप्पूला थोडेसुद्धा रागवले नाही. त्याच्या जवळ गेले. त्याची प्रेमाने विचारपूस केली व म्हणाले, "चुका होत असतात, पण त्या प्रामाणिकपणे कबूल करायला धैर्य लागते. तू ते दाखवले आहेस. तुझं चालताना लक्ष नव्हतं म्हणून तुझा पाय रोपट्यावर पडला. उद्या शाळेत येताना मी दोन रोपं आणणार आहे.
त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी. गुरुजींनी पप्पूला दोन रोपं दिले. पप्पूला तर आकाश ठेंगणे वाटत होते.आता त्याचे ओठ थरथरत नव्हते, पाय लटपटत नव्हते. तो उत्साहाने गुरुजीकडे पाहत होता. सर्व मुलांना पप्पू म्हणाला, "माझी चूक झाली, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. मला आपल्या खेळ गटातून काढू नका. सर्वांनी त्याला आपल्या खेळ गटात सामील करून घेण्यास संमती दर्शवली. गुरुजी म्हणाले, "मुलांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली, ज्या रोपट्याचा शेंडा पप्पू कडून तुटला त्याला नवीन धुमारे फुटतील रोपं जिवंत राहील आणि मोठे होईल. मी ते रोप स्वतः पाहून आलो आहे. हे ऐकून मुलांना आनंद झाला.
गेणू शिंदे
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment