वासाची किंमत
एका छोट्या गावांमध्ये आठ नऊ वर्षाची शिवानी राहत होती. ती भारी चतुर. शाळा, घर, शेत, बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खूश असायचे. रविवारी गावाचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई-बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली.
मिठाई पहात ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए, मुली। चल पैसे काढ." शिवानी म्हणाली, "कसले पैसे." मघापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना!म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? "पैसे दिलेच पाहिजेत, म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा! नेहमीच असं काहीतरी विचित्र वागतो. असे कोणीतरी म्हणाले. शिवानीला काहीतरी सुचले. 'ठीक आहे, थांबा. मी पैसे घेऊन येते.'असे म्हणून गर्दीतुन वाट काढत ती आई-बाबांकडे निघाली. शिवानी आईला म्हणाली, "भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे गं मला."आई म्हणाली, "का गं? काय झालं? कशाला पाहिजे?"अगं आई, ती एक गंम आहे. तू पण चल. चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी आल्या.
हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा...खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. शिवानी म्हणाली, "हलवाई दादा, मिळाले का पैसे?"हलवाई म्हणाला, "कसले पैसे? कुठे मिळाले?" शिवानी म्हणाली, अहो। तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज. बरोबर की नाही? "बरोबर! गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment