चिमटा
चंदू आज खूप आनंदात होता. आज गावची यात्रा होती. तो आपल्या मित्रांबरोबर यात्रेमध्ये जाणार होता. चंदू आपल्या आईबरोबर एका छोट्या घरांमध्ये राहत. चंदूला यात्रेत जायचे म्हणून आईने घाईगडबडीने चुल पेटवली. पटकन एक भाकरी तव्यावर टाकली. चिमटा नसल्यामुळे तिने ती भाकरी हातानेच उलटी पलटी केली. तिच्या हाताला चटके बसत होते, परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंद होता. चंदूने पटपट तेल- मीठ लावून भाकरी खाल्ली. तो आईला म्हणाला, "आई, मला येण्यास जरा उशीर होईल."आई म्हणाली, "बाळा! सावकाश जा आणि हे घे पन्नास रुपये. तुला यात्रेमध्ये खर्चासाठी. चंदूने दहा दहाच्या पाच नोटा पटकन खिशात ठेवल्या.
तो मित्रांबरोबर यात्रेत निघाला. यात्रेमध्ये पाळणे आले होते. खेळणीचे दुकान, रसाचे दुकान, मिठाईचे दुकान होते. पण चंदूने मात्र यातील काहीच घेतले नाही. एका ठिकाणी त्याला भांड्याचे दुकान दिसले. तो त्या दुकानात जवळ गेला. त्याला दुकानात एक चिमटा दिसला. त्याने दुकानदाराला विचारले हा चिमटा केवढ्याचा आहे? दुकानदाराने त्याची किंमत साठ रुपये सांगितली. चंदू म्हणाला, "माझ्याकडे पन्नास रुपये आहेत .दुकानदारांने तो चिमटा चंदूला दिला. चंदूच्या चेहऱ्यावर आनंद होता. दिवस मावळतीला आला आणि चंदू घरी आला. आल्याबरोबर आईच्या मांडीवर बसला.आईने विचारले, "बाळा! दिवसभर यात्रेमध्ये काय काय केले?"
चंदू म्हणाला, "आई यात्रेतून मी तुझ्यासाठी गंमत आणली आहे. आणि त्याने तो चिमटा आईच्या हातात दिला. चिमटा पाहताच आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कारण, चंदूने स्वतःसाठी यात्रेत काहीच घेतले नव्हते, पण आपल्या आईच्या हाताला बसणारे चटके त्याच्या मनाला जाणवले होते. त्यामुळे त्याने यात्रेत दिसणाऱ्या कोणत्याही वस्तू न घेता चिमटा घेतला. चंदू आईच्या कुशीत आनंदाने विसावला होता. आईलाही चंदू सारखा मुलगा मिळाला म्हणून अभिमान वाटत होता.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment