हत्तीचे गर्वहरण
एक जंगल होते. त्या जंगलामध्ये खूप प्राणी व पशु पक्षी रहात होते. त्यामध्ये एक खूप मोठा हत्ती होता; परंतु हत्तीला आपल्या शक्तीचा खूपच गर्व झालेला होता. हत्ती नेहमी इतर प्राण्यांना खूप त्रास देत असत.झाडे पाडत, पक्ष्यांची घरटे उद्ध्वस्त करत, माकडांची घरे उद्ध्वस्त करत असे. जंगलातील वारूळ देखील तो उध्वस्त करत असत. त्याच्या या वागण्याचा सर्व प्राण्यांना खूपच त्रास होत असे परंतु हत्तीचा सामना कोणीच करू शकत नव्हते.
एकदा हत्तीने एक वारूळ उद्ध्वस्त केले होते. त्या वारूळा मध्ये खूप मुंग्या राहात होत्या. हत्तीने पायाने ते वारूळ उद्ध्वस्त केले होते, तुडवले होते.त्यामुळे मुंग्यांचा सर्व अन्नसाठा वाया गेला होता. मुंग्यांना खूपच राग आला होता. त्यांनी ठरवले की या हत्तीला आपण धडा शिकवायचा. एकीचे बळ खरच खूप मोठे असते. मुंग्यांनी एकी केली. एक विचार केला आणि हत्तीला धडा शिकवण्याचे ठरवले.
एक दिवस हत्ती चारा खाऊन झोपला होता. तेव्हा सर्व मुंग्या त्याच्याजवळ गेल्या आणि त्याच्या कानामध्ये जाऊन बसल्या. मुंग्यांनी त्याच्या कानामध्ये दंश करायला सुरुवात केली. हत्ती खूपच कळवळू लागला. त्याला खूप त्रास होऊ लागला. तो कान झटकू लागला आणि मुंग्यांना म्हणाला," मुंग्यांनो , माझ्या कानामध्ये काय करत आहात लवकर बाहेर निघा."
परंतु मुंग्या काही ऐकेना. मुंग्या त्याला म्हणाल्या," तू आमची घरे उद्ध्वस्त करतो, सर्व प्राण्यांना त्रास देतो, आम्ही आशा बाहेर येणार नाही." हत्ती त्यांच्या या त्रासा पुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला," मला माफ करा. मी आता इथून पुढे कोणालाही त्रास देणार नाही." मग सगळ्या मुंग्या हत्तीच्या कानातून बाहेर निघाल्या. तेव्हापासून हत्ती सगळ्यांशी खूप चांगल्या प्रकारे वागू लागला. सर्व प्राण्यांना ही हकीकत कळाली. सर्व प्राणी खूपच खूष झाले आणि मुंग्यांच्या एकी पुढे आणि युक्ती पुढे नतमस्तक झाले. कीर्ती लहान असली तरी मूर्ती महान हेच खरे.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment