शेरास सव्वाशेर
एका जंगलामध्ये एक म्हातारी आजी छोट्याशा झोपली मध्ये राहत होती.दोन चोरांनी पाहिले, म्हातारी एकटीच झोपडीत राहते.दोघांनी विचार केला, आपण त्या म्हातारीला फसवू आणि तिच्याकडील सोने-नाणे आणि पैसे लुटू. एक दिवस ते दोन्ही चोर म्हातारीच्या दारात आले.
ते म्हातारीला म्हणाले, "आम्ही खूप गरीब आहे. आम्हाला काहीतरी काम द्या. म्हातारीने ओळखले, हे दोघे खरच गरीब नाही. हे भामटे आहेत. म्हातारी म्हणाली, "ठीक आहे. आज तुम्ही माझ्या दारातील हा रांजण भरा. म्हणजे संध्याकाळी मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करीन. दोघेही शेजारच्या तळ्यातून पाणी आणू लागले आणि रांजण भरू लागले. खूप वेळ झाला पण रांजण काही भरेना. म्हातारीने अगोदरच रांजणाच्या तळाशी एक मोठे छिद्र पाडून ठेवले होते. वरून पाणी टाकले की ते तसेच छिद्रावाटे निघून जायचे. दोन्ही चोर थकले आणि म्हातारी जवळ येऊन बसले. बोलता बोलता ते म्हातारीला म्हणाले, अग म्हातारे, तू एकटीच जंगलात राहतेस. तुझ्या जवळचे सोने-नाणे कोणी येऊन लुटेल की. म्हातारी मनातच हसली. तिने चोरांच्या मनातील कुटील डाव ओळखला होता. ती त्या चोरांना म्हणाली ,"अरे बाबांनो! मी माझे सगळे सोने-नाणे शेजारच्या विहिरी मध्ये टाकले आहे. चोरांनी एकमेकाकडे पाहीले व झोपायला निघून गेले. मध्यरात्र उलटली. दोन्ही चोर हळूच उठले व विहिरीकडे गेले. विहिरीमध्ये पाणी होते. एक चोर विहिरीमध्ये उतरला व त्यांनी बुडी मारली. विहीरीच्या तळाशी एक लोखंडी पेटी असलेली त्याला जाणवली, पण ती खूप जड होती. त्यामुळे दोघांनी अगोदर विहिरीतले पाणी काढण्याचे ठरवले. दोघेही रात्रभर विहिरीचे पाणी काढू लागले. विहिरीचे पाणी काढले की पाणी आपोआप म्हातारीच्या शेताला मिळत होते. म्हातारीने तशी तजवीज करून ठेवली होती. सकाळ झाली. तळाशी पेटी दिसू लागली. एक चोर खाली उतरला त्यांनी पेटी उघडून पाहिली तर पेटी मध्ये दगड-गोटे भरलेले होते. त्याने ओळखले म्हातारीने आपल्याला फसवले. त्याने पेटीतील दगडगोटे काढले आणि तो स्वतः पेटी मध्ये बसला. वरच्याला आवाज दिला, आता पेटी वर ओढ. पेटी वर आली,तशी ती डोक्यावर घेऊन दुसरी चोर आपल्या जोडीदाराला विहिरीत ठेवून पळत सुटला.
पेटीत बसलेला चोर मात्र हसत होता. खूप दूर आल्यावर चोराने ती पेटी खाली ठेवली आणि उघडी. पाहतो तर काय? दुसरा चोर त्या पेटीत बसलेला होता. त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तो पेटीतील चोर म्हणाला, अरे! म्हातारी आपल्यापेक्षा सव्वाशेर होती. पेटीत दगड-गोटे भरले होते. आपण पाणी उपसले आणि ते पाणी तिच्या शेताला मिळाले. अशाप्रकारे चोरांना शेरास सव्वाशेर म्हातारी भेटली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment