संस्कार
तेजस बाहेरची लाईट चालू आहे, बंद कर. हो! करतो बाबा. हे आमचे बाबा. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. विनाकारण चालू असणारी लाईट, आणि वाया जाणारे पाणी त्यांना कधीच आवडत नाही. खरं तर, आज माझी मुलाखत, पण मुलाखत उशीरा आहे. त्यामुळे मी सर्व काही शांत मनाने आवरत होतो. मनात मात्र धाकधूक होती.
माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. एका इंटरनॅशनल कंपनी मध्ये आपण कितपत टिकणार ही मनात शंका होती. असो! तयारी तर केली पाहिजे ,आणि गेलेही पाहिजे. मुलाखतीची वेळ जवळ आली. तसे सर्व आवरून मी निघालो. आई, बाबांना नमस्कार केला आणि रिक्षात बसून निघालो. कंपनीच्या जवळ आल्यानंतर पाहिले, सर्व काही सामसूम वाटत होते. मी वेटिंग रूम मध्ये गेलो. माझ्या शिवाय तिथे कोणीच नव्हते. वेटिंग रूम मधील सर्व लाईट चालू होत्या. काहीवेळ मला अस्वस्थ वाटले. मग मी नेहमीच्या सवयी प्रमाणे आवश्यक नसणाऱ्या लाईटचे बटन बंद केले. आणि बसलो. तेवढ्यात जिन्यावरून पाय आपटत शिपाई आला. तेजस शामकुमार काराळे तुम्हीच का? चला पाच मिनिटात तुमची मुलाखत होईल. वर बसा, आणि तो वेटिंग रूमचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून निघून गेला. मी जिन्यावरून जाण्याअगोदर दरवाजा पूर्ण लावला. वॉशिंग रूममध्येही पाण्याचा नळ अर्धवट चालू होता. तो बंद केला. आणि वर गेलो. हलकेच दरवाजा टकटक वाजवला. आत येण्याची परवानगी मागितली. आतून आत येण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आत गेलो. आतमधील लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसत होता. एका साहेबाच्या हातामध्ये एक लिफाफा होता. त्याने तो माझ्या समोर धरला व मला म्हणाले, "तेजस काराळे, तुमची मुलाखत झाली. तुम्हाला आम्ही सर्वांनी मिळून सिलेक्ट केले आहे. मी पुरता गोंधळून गेलो .कारण, नुकताच तर मी आत मध्ये आलो होतो. मुलाखतीसाठी एकही प्रश्न विचारला नाही, मग माझी मुलाखत झाली कशी? मला काही कळेना. तेवढ्यात त्यांनी मला बसण्यासाठी सांगितले. आम्हाला आमच्या कंपनीसाठी एका वर्करची नाही, तर ही कंपनी आपली आहे अशा आपल्या माणसाची गरज होती. तुम्ही शासकीय कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे.तुमचे कॉलिफिकेशन चांगले आहे.त्याच बरोबर आम्हाला आमच्या कंपनी साठी हुशार आणि कंपनी विषयी आपुलकी असणारे व्यक्ती हवी होती.
कंपनीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तुम्ही वेटिंग रूम मध्ये विनाकारण चालू असलेले लाईट बंद केले. अर्धवट उघडा दरवाजा बंद केला. अर्धवट चालू असणारा पाण्याचा नळ बंद केला. हीच तुमची मुलाखत होती. आमच्या कंपनीकडून तुम्हाला हे जाॅईनिंग लेटर देण्यात येत आहे. मी खूप आनंदित झालो होतो. जाॅईनिंग लेटर हातात घेऊन मी घरी आलो, आणि माझ्या शिक्षक वडिलांना मिठी मारली. माझे शिक्षण जरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असले, तरी त्या शाळेने मला शिक्षणाबरोबर संस्कार ही दिले होते. आणि आज ते संस्कार माझ्या उपयोगी आले होते. खरोखर मला आज माझ्या जिल्हा परिषद शाळेचा आणि माझ्या शिक्षकांचा सार्थ अभिमान वाटत होता.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment